मोबाईल टॉवर कंपन्यांकडे मनपाचे थकले तब्बल २८ कोटी

Foto

औरंगाबाद: शहरात अनेक ठिकाणी अनेक मोबाईल कंपन्यांनी टॉवर उभारले आहेत. या कंपन्यांकडे मनपा प्रशासनाचे सुमारे २८ कोटी रुपये थकले असून, वसुलीच्या कामाला गती मिळत नसल्याने ही रक्‍कम वसूल होत नसल्याचे सूत्रांकडून समजते.
शहरात ठिकाणी विविध मोबाईल कंपन्यांचे टॉवर उभारण्यात आलेले आहेत. यात काही टॉवर अनधिकृतपणे उभारण्यात आले आहेत. एकूण ४८१ टॉवर असून, महापालिकेचे करापोटी मोबाईल कंपन्यांकडे २८ कोटी रुपये थकले आहेत.

ही रक्‍कम वसूल करण्यासंबंधी मोबाईल कंपन्यांसोबत वारंवार बैठका होऊनदेखील थकबाकी वसुलीच्या कामाला गती मिळत नसल्याचे चित्र समोर येत आहे. अनेक वेळा तर मनपा प्रशासनाने संबंधित मोबाईल कंपन्यांना कारवाई करण्याचा इशारादेखील दिला; परंतु त्याचाही फारसा फरक पडलेला दिसत नाही. ३१ मार्च रोजी शहरातील प्रभाग कार्यालयांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या मोबाईल टॉवरच्या कर वसुलीची मोहीम राबवली होती. यात विविध मोबाईल टॉवर कंपन्यांकडून एकूण ४ कोटी ५४ लाख ९९ हजार ८४९ रूपयाचा कर वसूल करण्यात आला होता. त्यावेळी नोडल अधिकारी शिवाजी झनझन व त्यांच्या पथकाने रिलायन्स जिओ कंपनीकडून १ कोटी २६ लाख २० हजार १४५ रूपये व इंडस टॉवर यांच्याकडून ६ लाख ६० हजार २७२ रूपयांचा मालमत्ता कर वसूल केला. त्यानंतर पुन्हा नुकताच रलायन्स जिओ कंपनीकडून २ कोटी २७ लाख ६२ हजार ६६७ रूपयांचा कर वसूल करण्यात आला असल्याचे समजते. रिलायन्स जिओचे शहरात एकूण ९७ टॉवर असून, त्यापैकी ८४ टॉवरचा कर कंपनीने भरलेला आहे. टॉवर उभारणार्‍या मोबाईल कंपन्यांकडील थकबाकी २८ कोटींच्या घरात असताना वसुलीचा आकडा मात्र अंदाजे ३ कोटींच्या जवळपास थांबलेला असल्याचे सूत्रांकडून समजते. या थकबाकीसंबंधी येत्या १६ तारखेला बैठक होणार असल्याचे समजते.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker